बीड,लाईव्ह अशोका टाईम्स. प्रतिनिधी:
स्वतंत्र भारताला ऑलिंपिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त १५ जानेवारी रोजी बीडमध्ये ‘राज्य क्रीडा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भव्य पायी रॅलीने प्रारंभ
कार्यक्रमाची सुरुवात उत्साही वातावरणात झाली. छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हा क्रीडा संकुल दरम्यान खेळाडूंची भव्य पायी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये बीड शहरातील विविध संस्थांचे खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या समारोपानंतर जिल्हा क्रीडा संकुलात ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
क्रीडा संस्कृती रुजवणे काळाची गरज – शिवकुमार स्वामी
यावेळी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी म्हणाले की, “राज्य क्रीडा दिनाच्या आयोजनामुळे केवळ शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही क्रीडा संस्कृती रुजवण्यास मोठी मदत होत आहे. खाशाबा जाधव यांचा जीवनप्रवास नवोदित खेळाडूंना प्रतिकूल परिस्थितीतून यश मिळवण्यासाठी सदैव प्रेरणा देत राहील.”
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा प्रशिक्षक आणि शालेय तसेच महाविद्यालयीन खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.














