जालना,रामकिसनअवधूत (प्रतिनिधी):
जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज मतदानाच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज शहरातील विविध मतदान केंद्रांना धावती भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला. यावेळी “जालना शहराच्या विकासासाठी जनतेने ‘वंचित’ला कौल दिला असून, महापालिकेवर वंचितचाच झेंडा फडकेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून विकासाचा नवा पॅटर्न
माध्यमांशी बोलताना दीपक डोके यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले की, “आम्ही केवळ निवडणुका लढवण्यासाठी उमेदवार उभे केले नाहीत, तर ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रभावी वापर करून समाजातील सर्व स्तरांतील आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणारे उमेदवार दिले आहेत. शहराचा विकास आणि जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे, हे जनतेने ओळखले आहे.”
राजकीय पुढाऱ्यांवर सडकून टीका
विद्यमान राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना डोके यांनी स्थानिक नेत्यांवर जोरदार प्रहार केला. “आजवरच्या राजकीय पुढाऱ्यांनी केवळ स्वतःची घरे भरण्याचे काम केले, शहराच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता इथली स्वाभिमानी जनता या स्वार्थी राजकारणाला मतदानातून उत्तर देईल. उद्याचा निकाल हा प्रस्थापितांना धक्का देणारा असेल,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
सामाजिक सलोखा जपण्याचे आश्वासन
वंचित बहुजन आघाडी सत्ता स्थापन केल्यानंतर केवळ विकासकामेच करणार नाही, तर शहराचा सामाजिक आणि सांस्कृतिक सलोखा जपण्याला प्राधान्य देईल, असा शब्दही त्यांनी यावेळी शहरवासीयांना दिला.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या भेटीदरम्यान दीपक डोके यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात, सम्यक विद्यार्थी आंदोलन जालना जिल्हा अध्यक्ष सुरज सोनवणे, शहर महासचिव ऍड. सुबोध बुक्तरे, तालुका संघटक राजरत्न अचलखांब, बौधाचार्य दिलीप मगर यांच्यासह आघाडीचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













