सुखापूरी,रामकिसन अवधूत (प्रतिनिधी):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय, अंबड (नॅक – अ दर्जा प्राप्त) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) विशेष शिबिराचे उद्घाटन आज अंबड तालुक्यातील सुखापूरी येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
हे शिबिर दिनांक १५ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले असून दररोज विविध सामाजिक व शैक्षणिक विषयांवर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शिबिरात शाश्वत विकासासाठी युवकांची भूमिका, जलसंधारण व पाणलोट क्षेत्र विकास हे प्रमुख विषय केंद्रस्थानी असणार आहेत.
शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा. डॉ. निसार अहमद देशमुख यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. सोमनाथ खाडे सर (रा.से.यो. संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. सोमनाथ खाडे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वतःला कसे घडवावे, जीवनात ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व, तसेच नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला पिकवणे व आहारात भाजीपाल्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. समाजासाठी काहीतरी दान करण्याची भावना विद्यार्थ्यांनी अंगीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे डॉ. निसार अहमद देशमुख यांनी विद्यार्थ्यांना राजकारणाचे सामाजिक भान, तसेच मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. अंकुशराव टोपे यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे महत्त्व सांगितले.
यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती मा. रईस भाई बागवान यांनी “शून्यातून विश्व कसे निर्माण करावे” याबाबत प्रेरणादायी विचार मांडले. ध्येय निश्चित असेल तरच जीवनात यश मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक व वैयक्तिक विकासासाठी रा.से.यो. शिबिराचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्रा. रविंद्रजी पैठणे यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपक राखुंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. संपत पवार यांनी मानले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) जालना जिल्हाध्यक्ष मा. डॉ. निसार अहमद देशमुख, उपसभापती मा. रईस भाई बागवान, सुखापूरीचे सरपंच मा. भगवान भाऊ राखुंडे, उपसरपंच नसीर भाई बागवान, माजी उपसरपंच बाबासाहेब बाबर, लहुराव राखुंडे, अंकुश जीजा लहुटे, दत्तू फाटक, रशिदजी बागवान, सुखापूरी पोलीस पाटील इलियास बागवान, सुरेश पाटील, फकीर महंमद बागवान, अशोक चांगले, गणेश जाधव, राम फाटक यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण व पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.













