अंबड,रामकिसन अवधूत (प्रतिनिधी):
तालुक्यातील सुखापूरी येथील उपविभागीय आरोग्य केंद्रात शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान, लॉयन्स नेत्र रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सुखापूरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले नेत्रदान शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिरात १०५ नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली, ज्यामध्ये २३ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
या शिबिराचे उद्घाटन सुखापूरीचे सरपंच भगवानराव राखुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती राईस बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती. समृद्ध साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाइस चेअरमन महेंद्र मेठी यांनीही शिबिरास भेट देऊन शांताई प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात आरोग्याबाबत मोठी जागृती निर्माण होते, असे प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
छत्रपती संभाजीनगर येथील लॉयन्स नेत्र रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. यामध्ये डॉ. शामली जाधव (ऑप्टोमेट्रिस्ट), डॉ. सचिन आडे, डॉ. गौतम एकाडे आणि डॉ. अविनाश सोनवणे यांनी विशेष योगदान दिले. तपासणी दरम्यान १८ रुग्णांमध्ये डोळ्यांचे गंभीर आजार आढळून आले असून, त्यांना पुढील उपचारांचा सल्ला देण्यात आला आहे.
लोकसहभाग आणि परिश्रम
या शिबिरासाठी परिसरातील शेतकरी, महिला, तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली संभाजी शिंदे, परमेश्वर शिंदे, योगेश गायकवाड, गोकुळ राखुंडे, देवा खंडागळे, अमीर सय्यद, नवनाथ उंडे, सुनील गायकवाड यांच्यासह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना दृष्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, परिसरातून शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













