सोलापूर:
येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापूरच्या राजकीय मैदानात ‘वंचित बहुजन आघाडी’ने (VBA) आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रस्थापित पक्षांवर जोरदार टीका करत, वंचित बहुजन आघाडीने आपला विकास आराखडा जाहीर केला आहे. “भाजपने आतापर्यंत केवळ स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या असून, सामान्य जनतेचा कोणताही विकास केलेला नाही,” असा आरोप करत वंचितांच्या न्याय हक्कासाठी ही निवडणूक लढणार असल्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.
युवा आणि निष्ठावंतांना प्राधान्य
वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत तरुणांना मोठी संधी दिली असून, महानगरपालिकेच्या ५० टक्के जागांवर युवकांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, ज्या कार्यकर्त्यांनी जमिनीवर राहून पक्षासाठी संघर्ष केला, त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. यामध्ये वडार, कैकाडी, लिंगायत, मुस्लिम आणि मायक्रो ओबीसी अशा सर्व समाजांना प्रतिनिधित्व देऊन ‘सामाजिक समतोल’ साधण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचा ‘सोलापूर विकास प्लॅन’:
सत्तेत आल्यास शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पक्षाने खालील प्रमुख आश्वासने दिली आहेत:पाणीप्रश्न: सोलापूरकरांचा जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक घराला नळ आणि नळाला पाणी देण्याचे वचन.
आरोग्य व्यवस्था: शहरात ३०० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारणार आणि नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक प्रभागात एक प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करणार.
शिक्षण: सरकारी शाळांचा दर्जा खाजगी शाळांच्या तोडीचा करून मोफत व सर्वोत्तम शिक्षण उपलब्ध करून देणार.रोजगार क्रांती: रखडलेली MIDC पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करून ५,००० हून अधिक युवकांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून देणार.
“ही निवडणूक वस्ती-नगराची परिस्थिती बदलण्यासाठी”
”मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही ३६ युवकांना संधी दिली होती, तोच वारसा आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही चालवत आहोत. ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून सोलापूरच्या वस्त्यांची आणि नगरांची दुरवस्था बदलण्यासाठी आहे,” अशी भावना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूरकरांनी यंदा ‘वंचित’ला एक संधी द्यावी, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.













