केज (प्रतिनिधी):
सोशल मीडियाचा गैरवापर करून एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे आणि जातीवाचक शिवीगाळ करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन उत्तम गलांडे (रा. चिंचोलीमाळी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
याप्रकरणी लखन व्यंकट हजारे (वय ३६ वर्षे, रा. भिमनगर, केज) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी तहसील कार्यालयासमोर लखन हजारे यांनी रोहन गलांडेला यापूर्वी केलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टबद्दल विचारणा केली होती. त्यावेळी रोहनने माफी मागून पुन्हा अशी चूक करणार नाही, असे आश्वासन दिले होते.
मात्र, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहन गलांडे याने पुन्हा आपल्या फेसबुक अकाऊंटवरून दलित समाजाचा उल्लेख करत अत्यंत खालच्या भाषेत आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ करणारी पोस्ट प्रसिद्ध केली. ही पोस्ट केवळ फेसबुकवरच मर्यादित न राहता, ‘SG-1 मराठी न्यूज’, ‘वंचित बहुजन आघाडी’ आणि ‘दिव्य लोकप्रभा’ यांसारख्या विविध व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर देखील व्हायरल करण्यात आली.
धमकी आणि जातीवाचक शिवीगाळ
इतकेच नव्हे तर, संशयित रोहनने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर लखन हजारे यांचे नाव घेऊन त्यांना धमकी दिली आणि जातीवाचक भाषेत अवमान केला. हा प्रकार सामाजिक सलोखा बिघडवणारा असल्याचे लक्षात येताच, हजारे यांनी केज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलीस कारवाई
या फिर्यादीवरून केज पोलिसांनी रोहन उत्तम गलांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक व्यंकटराम (IPS) हे करत आहेत.
सोशल मीडियावर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट टाकू नयेत, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.














