सुखापुरी,रामकिसनअवधूत (प्रतिनिधी):
अंबड तालुक्यातील लखमापुरी शिवारात मंगळवारी (दि. २३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे उसाला भीषण आग लागली. या आगीत चार शेतकऱ्यांचा अंदाजे १० एकर ऊस जळून खाक झाला असून, उसासह ठिबक सिंचन व पीव्हीसी पाईप्सचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे १० ते १२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
तुऱ्याचा वीजवाहिनीला स्पर्श अन् ठिणगी पडली
लखमापुरी येथील गट नं. ४३ मधील नंदराम आसाराम चित्राल, शंकर आसाराम चित्राल, संजय आसाराम चित्राल व गोपाल चंद्रकांत चित्राल यांच्या शेतात हा ऊस उभा होता. या शेतातून महावितरणची एल.टी. (L.T.) वीज वाहिनी गेलेली आहे. चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाची वाढ जोमाने झाली असून उसाला मोठे तुरे आले होते. वाऱ्यामुळे या तुऱ्यांचा स्पर्श वरून गेलेल्या वीजवाहिनीला झाला आणि त्यातून पडलेल्या ठिणगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले.
सिंचन व्यवस्थाही जळाली
आगीची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र, वाऱ्याचा वेग आणि उन्हाचा तडाखा यामुळे आग झपाट्याने पसरली. या आगीत केवळ ऊसच नाही, तर शेतात अंथरलेले महागडे ठिबक सिंचनाचे संच आणि पीव्हीसी पाईप्स पूर्णपणे जळून कोळसा झाले आहेत.
नुकसानभरपाईची मागणी
बटाईदार कुलदीप कवडे व कैलास भापकर यांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली आहे. रक्ताचे पाणी करून वाढवलेले पीक डोळ्यादेखत जळाल्याने चित्राल कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. संबंधित विभागाने तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.












