मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये उद्या २५ नोव्हेंबर रोजी भव्य महासभेचे आयोजन
लाईव्ह अशोका टाईम्स, मुंबई:
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या, मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पार्क येथे भव्य **‘संविधान सन्मान महासभेचे’** आयोजन करण्यात आले आहे. संविधानप्रेमी आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने या महासभेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल होणार आहेत.
टोलमाफीचा आग्रह:
जनतेचा हा महासागर लक्षात घेऊन, वंचित बहुजन आघाडीने सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. संविधानाच्या गौरवासाठी ये-जा करणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णपणे टोलमाफी द्यावी, असा आग्रह वंचित बहुजन आघाडीने धरला आहे.
या टोलनाक्यांवर विशेष मागणी:
या मागणीमध्ये विशेषतः सोमाटणे टोल नाका, उर्से टोल नाका, आणि वरोसोली टोल नाका या महत्त्वाच्या मार्गांवर संपूर्ण टोलमाफी देण्याचा ठाम उल्लेख करण्यात आला आहे. हजारो वाहनांना टोलमाफी मिळाल्यास येणाऱ्या जनतेला दिलासा मिळेल आणि संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला लोकशाही मूल्यांचा सन्मान अधिक भव्य होईल, असे वंचित बहुजन आघाडीकडून नमूद करण्यात आले आहे.
शिवाजी पार्कात होणाऱ्या या महासभेत संविधान रक्षणाचा संकल्प पुन्हा एकदा बुलंद आवाजात दुमदुमणार आहे. शासनाने टोलमाफीच्या मागणीवर काय निर्णय घेतला, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.













