पोलिस प्रशासन न्यूज.

सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली सामूहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन


बीडमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलनाचा उत्साहात शुभारंभ; वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान

​बीड | प्रतिनिधी:

“सशस्त्र सेना ध्वजदिन हा केवळ निधी संकलनाचा उपक्रम नसून, देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.

​जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथील नियोजन सभागृहात आयोजित ‘सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५’ निधी संकलनाचा शुभारंभ आणि २०२४ मधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालय प्रमुखांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

​शहीद जवानांना श्रद्धांजली व कुटुंबियांचा गौरव

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या भावनिक प्रसंगी शहीद सैनिकांच्या वीरपत्नी व वीरमातांचा शाल व श्रीफळ देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल प्रशस्तीपत्र व आर्थिक सहाय्य देऊन गौरविण्यात आले.

​उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यंत्रणांचे कौतुक

​सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ अंतर्गत निधी संकलनाचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी व उत्कृष्ट योगदान देण्यासाठी जिल्ह्यातील विविध कार्यालय प्रमुखांना स्मृतिचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणेने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

​निधी संकलनासाठी प्रशासनाचे आवाहन

​जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी आपल्या भाषणात पुढे नमूद केले की, सैनिकांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक आणि सामूहिक जबाबदारी आहे. या निधीचा उपयोग माजी सैनिकांचे पुनर्वसन, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण आणि वीरनारींच्या कल्याणासाठी केला जातो. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, संस्थांनी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी या पवित्र कार्यात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

​या सोहळ्याला मोठ्या संख्येने माजी सैनिक, युद्धविधवा, वीरमाता, वीरपत्नी तसेच विविध विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!