परळी प्रतिनिधी (5 ऑक्टोबर 2025):परळी शहर आणि परिसरात आज बौद्ध धम्माचे वातावरण अनुभवायला मिळाले. भीम नगर, जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बुद्ध विहाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म रॅलीने परळी शहराचे लक्ष वेधून घेतले. किल्लारी येथील पूज्य भंते धम्मसार थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या तीन महिन्यांच्या वर्षावास अधिष्ठानाचा आज दिमाखदार समारोप झाला.सकाळी 10 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. बसवकल्याण येथील पूज्य भंते धम्मनाग महाथेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर लगेचच भंते व श्रमनेर संघाला भोजनदान देण्यात आले. धम्मदेशनेनंतर, भंते धम्मसार थेरो यांच्या अनेक वर्षांच्या धम्म कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना एक चारचाकी वाहन दान देण्यात आले.वर्षावासाच्या काळात भीम नगर येथील सुमारे 90 उपासकांनी रोज भंतेजींना भोजनदान आणि सायंकाळी सामूहिक खीरदान करण्याची सेवा केली. या 90 उपासकांच्या समर्पण भावनेतून हा वर्षावास यशस्वी झाला.पांढरे वस्त्र परिधान करून सहभाग: सकाळी 11 वाजता मुख्य धम्म रॅलीला सुरुवात झाली. या ऐतिहासिक रॅलीमध्ये उंट, घोडे आणि पारंपरिक वाद्यांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे रॅलीला विशेष भव्यता लाभली. संयोजन समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत परळी परिसर व शहरातील सर्व श्रद्धावान बुद्ध उपासक-उपासिकांनी पांढरे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग घेतला. रॅलीच्या यशस्वीतेनंतर सामूहिक भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. Parant Bhavya dhammariyali संयोजन समितीने सर्व बौद्ध बांधवांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन केले होते. या भव्य आयोजनातून परळीमध्ये बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला मोठी चालना मिळाली आहे.













