बीड | प्रतिनिधी
नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार अशोक काळकुटे यांच्याशी पोलिसांनी अरेरावी करून उलट त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पत्रकार संघटनांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीन दिवसांत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी ‘ टि.व्हि. 9 मराठी’ या वृत्तवाहिनीचे बीड जिल्हा प्रतिनिधी अशोक काळकुटे हे वार्तांकनासाठी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावीची वागणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर “शासकीय कामात अडथळा आणला” व “पोलिसांची बदनामी केली” या कारणांवरून काळकुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप होत असून, यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध केल्यामुळेच पोलिसांनी मनात राग धरून पत्रकारावर गुन्हा दाखल केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. या घटनेचे काही व्हिडिओदेखील समोर आल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
नेकनूर पोलीस ठाण्याची कामगिरी यापूर्वीही वादग्रस्त ठरली असल्याचे नमूद करत नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “पोलीस प्रशासनात हुकूमशाही सुरू आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषतः API चंद्रकांत गोसावी, गोपनीय शाखेचे कॉन्स्टेबल बालासाहेब ढाकणे आणि पोलिस हवालदार दत्ता बळवंत यांच्याविरोधात वारंवार गंभीर तक्रारी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून पत्रकार अशोक काळकुटे यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घ्यावा व दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या तीन दिवसांत व्यापक स्वरूपाचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
या वेळी शिष्टमंडळात ज्येष्ठ संपादक गंगाधर काळकुटे, दीपक थोरात, बालाजी जगतकर, लक्ष्मण गायकवाड, अनंत मुंडे, अभिजीत पवार, रोहित दीक्षित, योगेश काशीद, अंगद मोहिते, रामहरी मेटे, कुंडली खांडे, स्वप्निल वर्पे, शंकर कानडे, हनुमंत शिंदे आदी उपस्थित होते.
पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या या घटनेमुळे जिल्हाभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, प्रशासनाची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













