केज,येवता /प्रतिनीधी:
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या ‘बीड जिल्हा बंद’च्या हाकेला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील येवता गाव कडकडीत बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
व्यापारी व ग्रामस्थांचे १०० टक्के सहकार्य
मराठा आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी येवता परिसरातील सर्व व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार आणि व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवून या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व दैनंदिन व्यवहार दिवसभर ठप्प राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येण्याचे आवाहन
आंदोलनाची पुढील दिशा आणि उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यासाठी गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व गावकरी बांधवांनी गुरुवारी सकाळी ठीक ९:०० वाजता राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ एकत्र जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन अंतरवाली सराटी येथील उपोषणाला जाहीर पाठिंबा देणार आहेत.
’एक मराठा, लाख मराठा’चा निर्धार
“आमचा एकच निर्धार, मराठा आरक्षण घेणारच!” या भूमिकेवर ठाम राहत गावकऱ्यांनी शांततामय मार्गाने हा बंद यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या बंदच्या माध्यमातून संपूर्ण गावातून मराठा आरक्षणाच्या लढ्याला भक्कम पाठबळ दिले जात असून, समस्त येवता ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










