प्रमोद महाजनांसारखे दिग्गज घडवणारी केजची शाळा पुन्हा गजबजणार; २६ जानेवारीला भव्य मेळाव्याचे आयोजन
केज | प्रतिनिधी
ज्या शाळेने देशाला केंद्रीय मंत्री, राज्याला सनदी अधिकारी, न्यायाधीश आणि अनेक पोलीस अधिकारी दिले, ती केजची ऐतिहासिक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गेल्या काही काळापासून पटसंख्येअभावी बंद पडली आहे. मात्र, आपल्या शाळेची ही दुरावस्था पाहून आता माजी विद्यार्थी सरसावले असून, ‘मिशन २०२६’ अंतर्गत ही शाळा पुन्हा सुरू करण्याचा चंग ६०० माजी विद्यार्थ्यांनी बांधला आहे.
नामवंत विद्यार्थ्यांची खाण
केज येथील ही जिल्हा परिषद शाळा तालुक्यातील एकमेव नावाजलेली शाळा होती. दिवंगत केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्यासह अनेक नामवंत न्यायाधीश आणि देशसेवा करणारे सैनिक याच शाळेच्या बाकावर घडले. मात्र, शहरात वाढलेली खाजगी इंग्रजी माध्यमांची शाळांची स्पर्धा आणि विद्यार्थ्यांच्या अभावामुळे या शाळेला टाळे लागले. आज शाळेची भव्य इमारत धुळखात पडली असून खिडक्या-दारांची पडझड झाली आहे.
सोशल मीडियातून जुळले नाते
शाळेच्या या दुरवस्थेबद्दल समाजमाध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्यावर जगभरात विविध पदांवर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी व्यथित झाले. १९८० ते १९९५ या काळात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एकत्र येत एक गट तयार केला. पाहता पाहता ६०० माजी विद्यार्थी या मोहिमेत सामील झाले आहेत.शाळेला गतवैभव मिळवून देण्यासाठी येत्या २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) रोजी केज येथे सर्व माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शाळेच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा निश्चित केला जाणार आहे.
असा आहे पुढील संकल्प:
दुरुस्ती व सुशोभीकरण: मे महिन्यापर्यंत शाळेच्या इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि फर्निचरचे काम पूर्ण करणे.
प्रवेश मोहीम: जून २०२६ पासून इयत्ता ५ वी ते १० वीचे वर्ग पुन्हा सुरू करणे.
गरजूंची मदत: आर्थिक परिस्थितीअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना मोफत शालेय साहित्य देणे.
गुणवत्तेवर भर: खाजगी शाळांच्या तोडीस तोड शिक्षण देणारी ही शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करणे.
या लोकचळवळीत अनेक सामाजिक संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे केज तालुक्यात जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणाची नवी लाट निर्माण झाली असून, सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे.













