अंबड.(रामकिसन अवधूत)सुखापूरी (प्रतिनिधी):
अंबड तालुक्यातील लखमापूरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आनंद नगरी’ या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या आनंद नगरीत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात व्यवहारज्ञान व आर्थिक साक्षरतेची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
आनंद नगरीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, गोड-धोड पदार्थ, चटपटीत पदार्थांचे स्टॉल लावून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः गावातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच शेजारील सुखापूरी गावातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांनीही या उपक्रमाला भेट देत सहभाग नोंदवला.
या बाल आनंद नगरीतून सुमारे १५ हजार रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारातून पैशाचे व्यवस्थापन, विक्री-खरेदीची प्रक्रिया तसेच संघटन कौशल्याचा अनुभव मिळाला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय समिती व शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले.
आनंद नगरीचे उद्घाटन श्री. रामकिसन अवधूत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास लखमापूरी गावाचे सरपंच श्री. ज्ञानेश्वर तारगे, शालेय समिती अध्यक्ष अतुल गाडे, उपाध्यक्ष रवि कांबळे, ग्रामपंचायत सदस्य किशोर कांबळे, सुखदेव कासार, मच्छिंद्र काळे यांच्यासह राजरत्न सार्वजनिक वाचनालयाच्या सचिव श्रीमती लक्ष्मी अवधूत आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, व्यवहारज्ञान व उद्योजकतेची बीजे रुजतात, असे मत व्यक्त केले. लखमापूरी शाळेतील ‘आनंद नगरी’ हा उपक्रम ग्रामस्थांच्या सहभागातून यशस्वी ठरला.













