पोलिस प्रशासन न्यूज.

केज तालुक्यात शेतकरी चिंतेत! अनेक योजना राबवूनही पाण्याची समस्या कायम; पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिके करपू लागली


केज/प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील पाण्याची समस्या वर्षानुवर्षे कायम असून, शासनाकडून विविध जलसंधारणाच्या योजना आणि उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी पाण्याचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही. त्यातच केज तालुक्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र असल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गही त्रस्त झाला आहे.

दरवर्षी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या विविध योजना राबविल्या जातात. मात्र, या योजनांचा अपेक्षित परिणाम कितपत साध्य होतो, हा प्रश्न आजही कायम आहे. पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या केज तालुक्यातील शेतीची परिस्थितीही त्यामुळे चिंताजनक बनली आहे.

यंदा सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. त्यानंतर पिके जोमाने आली आणि शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. मात्र, सध्या पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी होत असून, अनेक ठिकाणी सोयाबीनची पिके करपू लागली आहेत.

पिकांवर केलेला खर्च, वाढती महागाई आणि त्यातच पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. पिकांना निर्णायक टप्प्यावर पावसाची गरज असताना पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

निसर्गाच्या अवकृपेची कायम धडकी

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निसर्गाची अवकृपा काही नवीन नाही. कधी अतिवृष्टी, तर कधी पावसाची दडी यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी संकटाचा सामना करावा लागतो. यंदाही पिके चांगली आली असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

शासनाने पाणीप्रश्नाच्या केवळ घोषणा आणि योजना न राबविता त्यांची प्रभावी व शाश्वत अंमलबजावणी करावी. तसेच सध्या पावसाअभावी अडचणीत आलेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी, अशी मागणी होत आहे


85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!