केज/प्रतिनिधी:
विडा जिल्हा परिषद गटातील गप्पेवाडी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गावातील बाराभाई वस्ती आणि महादेव वस्ती येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या विकासकामामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विडा जिल्हा परिषद गटाचे भावी उमेदवार दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे आणि भावी पंचायत समिती उमेदवार सुरज पटाईत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. गप्पेवाडी येथील युवा नेते अर्जुन केदार यांनी या रस्त्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यांच्या या प्रयत्नांमुळेच हा प्रश्न मार्गी लागला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी रामदास केदार, बळीराम केदार, हनुमंत केदार, बबन केदार, पांडुरंग केदार, दत्तात्रय केदार, सचिन काळे, संतोष केदार, रमेश केदार, माजी सरपंच वचिष्ठ केदार, महादेव केदार, कृष्णा चौरे, चांगदेव केदार यांच्यासह गावातील तरुण मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













