अहिल्यानगर: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्याने तसेच ओला दुष्काळ जाहीर न झाल्यामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आज (दि. २१) शेवगाव-पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव (जि. अहिल्यानगर) येथील निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केले.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी चटणी-भाकर खाऊन आपला निषेध नोंदवत ‘काळी दिवाळी’ साजरी केली. नुकसानीची भरपाई नाही: गेल्या काही दिवसांपूर्वी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, घरांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीनंतर अनेक नेते, पालकमंत्री, खासदार आणि आमदारांनी भागाचा दौरा करून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, दिवाळी उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तसेच शासनाने अद्याप ओला दुष्काळही जाहीर केला नाही.
यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आमदार राजळे यांच्या घरासमोर हे प्रतिकात्मक आंदोलन केले.













