बीड: शासकीय तंत्रनिकेतन, बीड (Government Polytechnic, Beed) येथील मुद्रण तंत्रज्ञान विभागाने यंदा प्लेसमेंटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विभागाच्या तृतीय वर्षाच्या (२०२५ बॅच) सर्व २४ विद्यार्थ्यांची देशातील दोन मोठ्या उद्योग समूहांमध्ये – Parksons Packaging आणि EPL (Essel Propack Ltd.) – प्लेसमेंटसाठी यशस्वी निवड झाली आहे. विभागाला १००% प्लेसमेंट मिळवण्याचा मान मिळाला आहे.
यशाची कारणे आणि प्रमुख योगदान
विभागाच्या उच्च शैक्षणिक गुणवत्तेमुळे आणि विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या विशेष प्रॅक्टिकल ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी केली.
या यशात विभागप्रमुख ए. एस. जाधव सर यांचे मार्गदर्शन, तसेच अधिव्याख्याता श्री. आठवले आर सी आणि श्रीमती एन ए बोधे यांचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत.
प्राचार्यांकडून कौतुक
संस्थेचे प्राचार्य डॉ. ए. के. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “मुद्रण तंत्रज्ञान विभागाची ही दर्जेदार कामगिरी आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे तंत्रनिकेतनाचे नाव उद्योग क्षेत्रात उज्ज्वल झाले आहे. आमचे विद्यार्थी उद्योग क्षेत्रात यशस्वीपणे चमकत राहतील, याचा आम्हाला विश्वास आहे.”
सहसंचालक डॉ. के बी लाढाने यांनी देखील १००% प्लेसमेंटबद्दल विद्यार्थी आणि विभागाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रवेश क्षमता वाढवण्याची मागणी
या शानदार यशानंतर संस्थेत आनंदाचे वातावरण असून पुढील शैक्षणिक वर्षात अधिकाधिक कंपन्या प्लेसमेंटसाठी येण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या उपलब्ध विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने, संस्थेतील मुद्रण तंत्रज्ञान विभागाची प्रवेश क्षमता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.














