बीड (प्रतिनिधी):
बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासासाठी आर्थिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत ६२३ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजना (विकास आराखडा) मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री भावूक झाल्या. “स्व. अजितदादांच्या स्वप्नातील विकसित, समृद्ध आणि प्रगत बीड साकार करण्यासाठी निधी आणि प्रशासकीय पातळीवर कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी एकत्र येऊन साथ द्यावी,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
🔹 बैठकीतील प्रमुख निर्णय व निधीची तरतूद :
धार्मिक व सांस्कृतिक विकास: बीडची ऐतिहासिक ओळख असलेल्या कंकालेश्वर मंदिर विकासासाठी ₹११.२१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
ग्रामीण पायाभूत सुविधा: ग्रामपंचायतींच्या जनसुविधांसाठी ₹३७.५३ कोटींचे विशेष अनुदान मंजूर. तसेच ९१ स्मशानभूमी शेड आणि नवीन ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे.
कृषी व पशुसंवर्धन: ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना दिलासा देण्यासाठी १८ पशुवैद्यकीय दवाखान्यांचे बांधकाम व दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली.
हरित बीड अभियान: पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जिल्ह्यात ६५.४९ लाख वृक्षलागवडीचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
अपारंपरिक ऊर्जा: सौर व हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ₹१२ कोटींची भरीव तरतूद.
शिक्षण व वाचन संस्कृती: बीड जिल्हा ग्रंथालयाच्या अद्ययावत इमारतीसाठी ₹२ कोटी मंजूर.
क्रीडा व संस्कृती: ‘स्व. खाशाबा जाधव चषक’ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या लोगो आणि शुभंकराचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
📌 पारदर्शकता आणि समन्वयावर भर
जिल्ह्यातील विकासकामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर वेगाने उभी राहावीत, यासाठी निधीचा प्रभावी वापर, आर्थिक शिस्त आणि प्रशासकीय पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने हातात हात घालून काम करावे, अशा कडक सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
बीड जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि सर्वसमावेशक प्रगती साधण्यासाठी हा ६२३ कोटींचा आराखडा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













