पोलिस प्रशासन न्यूज.

संघर्षाच्या मातीतून फुललेला शब्दांचा वटवृक्ष..!


साडेतीन दशकांची मूल्यनिष्ठ पत्रकारिता; समाजजागृती, संवेदनशीलता आणि स्वाभिमानाचा प्रेरणादायी प्रवास

—————-

सिंदफणा नदीच्या काठावरील सिरसमार्गच्या मातीत जन्मलेले ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांनी दारिद्र्य, संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थितीला कधीही शरण न जाता पत्रकारितेच्या बळावर स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. साडेतीन दशकांहून अधिक काळ त्यांनी बातमीला केवळ माहितीचे साधन न मानता, समाजपरिवर्तनाचे प्रभावी अस्त्र बनवले. त्यांच्या लेखणीतून वंचित, उपेक्षित आणि सर्वसामान्यांच्या वेदनांना आवाज मिळाला; तर असंख्य प्रश्नांना न्यायाची दिशा मिळाली.

 

दै. नवाकाळ, पुढारी, पुण्यनगरी, झुंजार नेता, सम्राट आणि लोकशा यांसारख्या प्रतिष्ठित दैनिकांत कार्य करताना त्यांनी सत्य, संवेदनशीलता आणि लोकहित यांनाच सर्वोच्च स्थान दिले. विशेषतः स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणावरील त्यांच्या धाडसी वृत्तमालिकेने महाराष्ट्राला अंतर्मुख केले आणि पत्रकारितेच्या सामाजिक जबाबदारीचा नवा आदर्श निर्माण केला. बातमीच्या प्रत्येक ओळीत त्यांनी माणुसकीचा स्पर्श जपला.

 

ग्रामीण भागातील नवोदित पत्रकारांना घडविणे, त्यांच्यात बातमीमूल्याची जाण निर्माण करणे आणि पत्रकारितेतील नैतिकतेचा वारसा देणे, हे त्यांचे मोठे योगदान आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून संयम, प्रामाणिकपणा, स्वाभिमान आणि निःस्वार्थ सेवाभाव हीच त्यांनी आयुष्यभराची ओळख बनवली. प्रतिकूल परिस्थितीत कुटुंब उभे करत शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची परंपरा जोपासणाऱ्या हजारे परिवारानेही समाजाप्रती असलेली बांधिलकी कृतीतून सिद्ध केली.

 

उत्तम हजारे हे केवळ ज्येष्ठ पत्रकार नाहीत, तर मराठवाड्याच्या पत्रकारितेतील विश्वास, मूल्यनिष्ठा आणि सामाजिक संवेदनशीलतेचे जिवंत प्रतीक आहेत. त्यांच्या प्रदीर्घ कार्यप्रवासाने पत्रकारितेच्या इतिहासात प्रेरणेचे सुवर्णपान लिहिले आहे. आजही त्यांची संयमी लेखणी अन्यायाविरुद्ध बोलते, सत्यासाठी उभी राहते आणि नव्या पिढीला सांगते, “पत्रकारिता ही पदाची नव्हे, तर समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची अखंड साधना आहे.” अशा या शब्दसाधकाला मनःपूर्वक अभिवादन!

-शब्दांकन : राजेंद्र जैन, कडा


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!