बीड (प्रतिनिधी):
बीड बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पाकीटमारी तसेच चोरी करणाऱ्या एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून मुद्देमालासह संशयिताला पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
प्रवाशांमध्ये होते भीतीचे वातावरण
बीड बसस्थानकात मागील काही महिन्यांपासून बसमध्ये चढताना प्रवाशांच्या खिशातील पाकिट, रोख रक्कम तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे प्रवाशांना लक्ष्य करत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दोन गुन्हे उघडकीस
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडून खालील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत:
शिवाजीनगर पोलीस ठाणे: गुन्हा क्रमांक २६८/२०२६
संभाजीनगर (परळी) पोलीस ठाणे: गुन्हा क्रमांक ५६/२०२६
कारवाई करणारे पोलीस पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, डीवायएसपी वेंकटराम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकामध्ये पीएसआय श्रीराम खटावकर, एनपीसी अर्जुन यादव, हेडकॉन्स्टेबल विकास राठोड, पोलीस कॉन्स्टेबल अशफाक सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल मनोज परजणे आणि चालक वडमारे मेजर यांचा समावेश होता.
दरम्यान, बसस्थानक परिसरात पोलिसांची चौकी आणि गस्त सुरू असली तरी, गर्दीच्या वेळेत होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी ही गस्त अधिक प्रभावी करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.











