लाईव्ह अशोका टाईम्स प्रतिनीधी
.बीड: बालविवाह मुक्तीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, आज, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बाल विवाह प्रतिबंध शपथ’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महिला व बाल विकास विभाग, बीड आणि युवा ग्राम विकास मंडळ, केज यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात, ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त तसेच ‘बाल विवाह मुक्त महाराष्ट्र – आपला संकल्प’ या १०० दिवसीय अभियानाचा भाग म्हणून, समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी बाल विवाह रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचा संदेश देण्यात आला.
“सामूहिक शपथ आणि दृढ निर्धार”
कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी बाल विवाह प्रतिबंधाची सामूहिक शपथ घेतली. बालकांचे सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठीचा हा संकल्प निश्चितच समाजपरिवर्तनाला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
जन जागृतीवर भर
यावेळी बाल विवाहातून वाचलेल्या मुलींसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर, बाल विवाह रोखण्यासाठी जनजागृती मोहीम अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. यापुढे शाळा–महाविद्यालये, धार्मिक स्थळे, ग्रामपंचायती आणि शहरी समुदाय पातळीवर जास्तीत जास्त जागरूकता पसरविण्याचा निर्धार करण्यात आला.













