मुंबई :
आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कोणत्याही स्वतंत्र चौकशीशिवाय मृत विद्यार्थ्यावर घाईघाईने आरोप करणे संस्थात्मकदृष्ट्या अत्यंत चुकीचे असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता आयआयटी बॉम्बेच्या डीनना प्रत्यक्ष भेटून जाब विचारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सुजात आंबेडकर यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत आयआयटी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र आक्षेप नोंदवला. “आयआयटी बॉम्बे ही कोणतीही तपास यंत्रणा नाही. असे असताना कोणत्याही अधिकृत आणि स्वतंत्र चौकशीचा अहवाल येण्याआधीच संस्थेने सार्वजनिक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात विद्यार्थ्याच्या मृत्यूचा संबंध थेट परीक्षेतील कथित गैरप्रकाराशी जोडणे अत्यंत आक्षेपार्ह आहे,” असे त्यांनी नमूद केले.
प्रशासनाच्या या भूमिकेवर टीका करताना त्यांनी पुढे म्हटले की, घाईघाईने तयार करण्यात आलेल्या अशा अधिकृत कथनामुळे समाजात पूर्वग्रहदूषित धारणा निर्माण होते. यामुळे मृत विद्यार्थ्याची सार्वजनिक पातळीवर नाहक बदनामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. संस्थेच्या या निवेदनानंतर माध्यमे व सोशल मीडियाच्या एका घटकाने त्यालाच अंतिम सत्य मानून वार्तांकन केले, ज्यामुळे प्रकरणाच्या निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशीची मूळ मागणी बाजूला पडली.
साहिल वाकोडे यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या जातीय भेदभावाच्या आणि अपमानाच्या आरोपांवरही त्यांनी लक्ष वेधले. “कुटुंबीयांचे आरोप केवळ प्राथमिक पातळीवर फेटाळून न लावता, संबंधित सर्व पुरावे आणि परिस्थितीची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
साहिल वाकोडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी, घटनेशी संबंधित सर्व डिजिटल व भौतिक पुरावे सुरक्षित ठेवणे आणि संस्थात्मक उत्तरदायित्व निश्चित करणे अत्यावश्यक आहे. मूळ चौकशी भरकटवून परीक्षेतील गैरप्रकार किंवा आरक्षणाचा मुद्दा पुढे करणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे सांगत, या सर्व प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी आज दुपारी आयआयटी कॅम्पसमध्ये धडक देणार असल्याचे सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले.











