बीड ( प्रतिनिधी):
स्थानिक ‘प्रवक्ता लोकशाहीचा’ कार्यालयात ‘महामानव अभिवादन ग्रुप’ आणि ‘वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि विविध महापुरुषांची जयंती व स्मृतिदिन मोठ्या उत्साहात व आदराने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हैदराबाद मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले नव्हते. अखेर १७ सप्टेंबर रोजी ‘पोलीस ॲक्शन’च्या माध्यमातून मराठवाडा निजामशाही आणि रझाकारांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला. या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शूरवीरांचे स्मरण यावेळी करण्यात आले.
याच दिवशी दक्षिण भारतातील थोर समाजसुधारक पेरियार ई. व्ही. रामास्वामी, बौद्ध पुनरुत्थानाचे प्रणेते अनागारिक धम्मपाल आणि विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ समाजसेवक जे. टी. साळवे यांनाही यावेळी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना समता सैनिक दलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी महापुरुषांच्या समाजोन्नतीच्या कार्यावर प्रकाश टाकला. ‘वाचाल तर वाचाल’चे डी. जी. वानखेडे यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची माहिती देताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर भैय्यासाहेबांनी ‘प्रबुद्ध भारत’ वृत्तपत्र अखंड सुरू ठेवले. तसेच महू ते चैत्यभूमी अशी भव्य समता ज्योत पदयात्रा काढून त्यातून मिळालेल्या दानातून दादर येथील चैत्यभूमी स्मारकाची निर्मिती केली.”
याप्रसंगी प्रशांत वासनिक, ॲड. तेजस वडमारे आणि जी. एम. भोले यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास विशद केला, तसेच जे. टी. साळवे यांच्या जीवनातील विपश्यनेचे महत्त्व आणि त्यांचा समाजकार्याचा आदर्श सर्वांनी जोपासावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ‘प्रवक्ता लोकशाहीचा’चे संपादक नितीन मुजमुले यांनी केले. या सभेस सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पी. व्ही. बनसोडे, बी. जी. दळवी यांच्यासह महामानव अभिवादन ग्रुपचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











