येवता (लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज):
शेतकऱ्यांचा सखा आणि सर्जा-राजाच्या ऋणातून उतराई होण्याचा सण म्हणजेच ‘बैलपोळा’ येवता ता.केज जि.बीड येथे पारंपरिक उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात घाम गाळणाऱ्या आपल्या लाडक्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावातील बळीराजा सकाळपासूनच उत्साहात दिसून आला.
गावातील मुख्य हनुमान मंदिर परिसरात सर्व शेतकरी बांधव आपापल्या बैलजोड्यांना विविध रंगांच्या झुल्या, फुगे, बाशिंग, घुंगरू आणि शिंगांना हिंगूळ लावून नटवून घेऊन आले होते. संपूर्ण परिसर बैलांच्या गळ्यातील घुंगरूमाळा आणि शेतकऱ्यांच्या उत्साहाने दुमदुमून गेला होता.
पाटलांच्या बैलांचा मानाचा मान आणि प्रदक्षिणा
गावातील पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार, सर्वात आधी गावातील दोन पाटलांच्या बैलांना मानाचे स्थान देण्यात आले. पाटलांचे बैल पुढे मार्गस्थ झाल्यानंतर, गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांसह मारुती मंदिराला प्रदक्षिणा घातली. मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपापल्या घरासमोर नेऊन सर्जा-राजाचे औक्षण केले, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मनोभावे पूजन केले.
या सोहळ्यात गावातील अबालवृद्धांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत पोळ्याचा आनंद द्विगुणीत केला.









