जालना / प्रतिनिधी:
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. “रद्द झालेली चार कुणबी प्रमाणपत्रे मिळाल्याशिवाय उपोषण पूर्णपणे सोडणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार सध्या फक्त पाणी पिऊन आणि सलाईन लावून आंदोलन सुरू ठेवणार असून, सरकारला मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी ४ दिवसांची मुदत दिली असल्याचे त्यांनी जाहीर केले.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता नोंदीनुसार प्रमाणपत्र द्या
माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “आम्हाला ओबीसींच्या हक्काचे १ टक्काही आरक्षण नको आहे. परंतु ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे आणि याला ओबीसी बांधवांचाही विरोध असण्याचे कारण नाही. उद्या जर हैदराबाद गझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले तर आम्ही शासनावर फुले उधळू.” तसेच सातारा आणि कोल्हापूर गझेटियरनुसार सरकारने तात्काळ जीआर काढावा आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ३ महिन्यांनंतर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आरक्षण केवळ ‘श्रेयवादात’ अडकले; विखे पाटलांवर गंभीर आरोप
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीचा उल्लेख करत जरांगे म्हणाले, “लाड साहेब खूप तळमळ करत आहेत, पण आपले आरक्षण फक्त राजकीय श्रेयवादात गुंतले आहे. लाड यांच्या शब्दाचा मान ठेवून मी उठून बसलो आहे, नाहीतर कोणताही मंत्री आला तरी मी मोजत नाही.”
यावेळी त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. “विखे पाटील कधीच खरे बोलत नाहीत. ते केवळ राजकारण करत असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचे त्यांच्याशी वैयक्तिक वैर नाही, परंतु ते सातत्याने दिशाभूल करत आहेत,” असा आरोप जरांगे यांनी केला.
मुंबईत येऊन हक्क मिळवण्याचा इशारा
सरकारने दिलेल्या चार दिवसांच्या मुदतीत निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि थेट मुंबईत येऊन बाकीच्या गोष्टी निकाली काढू, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. प्रमाणपत्रे मिळेपर्यंत मागे हटणार नाही, यावर ते ठाम आहेत.











