बीड:
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आणि धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NC) स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास घुले हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये काढण्यात आलेल्या विराट मोर्चातील भाषणानंतर हे प्रकरण चांगलेच तापले आहे.
गंगाधर काळकुटे यांच्या फिर्यादीवरून कारवाई
बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत आणि सभेत सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर एकेरी भाषेत घणाघाती टीका केली होती. या वक्तव्यांमुळे मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळली. जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सदावर्ते यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
सदावर्तेंचा नेमका आरोप काय होता?
मोर्चामध्ये भाषण करताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते की, “मनोज जरांगे यांच्या माध्यमातून समाजात विसंवाद पसरवण्याचे काम सुरू आहे. यांना ओबीसी नेता महसूलमंत्री म्हणून नको आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा वारंवार अपमान केला जात आहे. जर जरांगे यांनी यापुढे बावनकुळे यांचा अपमान केला, तर आम्हीही एकनाथ शिंदे यांचा अपमान करू.”
राजकीय व सामाजिक वातावरण तापले
सदावर्ते यांच्या वक्तव्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या असून, बीडमधील या कारवाईमुळे आता मराठा आरक्षण समर्थक आणि सदावर्ते यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.











