अहमदनगर | प्रतिनिधी सुनिल वाघमारे
९ जुलै २०२६
राहाता तालुक्यातील मौजे पिंपळस येथील महावितरण विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून वीज ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत, संबंधित दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
यासंदर्भात जिल्हा संघटक दिपक (बाबू) कसबे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपळस गावात नागरिकांच्या संमतीशिवाय आणि कोणतीही पूर्वसूचना न देता घरांतील जुने वीजमीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्यात आले. मीटर बदलताना पंचनामा देखिल करण्यात आला नाही. तसेच ग्राहकांची लेखी संमतीही घेण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये अचानक मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्वी साधारण ₹५०० ते ₹६०० इतके येणारे वीज बिल आता ₹२,००० किंवा त्याहून अधिक येत असल्याची चर्चा विजग्राहकां कडून होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच, महावितरण कार्यालयात मागील काही दिवसांपासून वारंवार तोंडी तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून समाधानकारक दखल घेतली जात नसून, तक्रार करणाऱ्या ग्राहकांना उलट दमदाटी केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, जुन्या व नवीन स्मार्ट मीटरचा क्रमांक प्रणालीमध्ये एकच दाखवून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्राहकांची फसवणूक होत असून सार्वजनिक मालमत्तेच्या व्यवस्थापनात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीने या संपूर्ण प्रकरणाची स्थानिक पातळीवर, निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच अन्यायग्रस्त वीज ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
पुढील ७ दिवसांत कारवाई न झाल्यास राहाता तालुक्यातील महावितरण कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी समाजसेवक रूपसाहेब बनसोडे, भारत भाऊ निकम, किशोर भाऊ पगारे, अनिल आवारे, शंकर दादा गायकवाड, जय भोसले, अनुराग निकम यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.













