अंबाजोगाई : दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या वतीने दिनांक ५ जून २०२६ रोजी केज तालुक्यातील मौजे आनंदगाव सारणी येथे ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत सेंद्रिय शेती विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना गोआधारित शेती, सेंद्रिय शेती तसेच पशुधनाधारित कृषी पूरक व्यवसायांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच श्री. संतोष भारत सोनवणे हे होते. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. संदिपान लालासाहेब सोनवणे, श्री. चंद्रकांत बालासाहेब सोनवणे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे पशुतज्ञ डॉ. रवींद्र कोरके उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्र कोरके यांनी सांगितले की, सध्याच्या काळात शेती उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून शेतकऱ्यांनी गोआधारित व नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी मृदापरीक्षण करून त्यानुसार संतुलित खत व्यवस्थापन करावे. रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळून शेणखत, हिरवळीची खते, पिकांचे अवशेष, काडी-कचरा, गांडूळखत आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सातत्याने घटत असून ते वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनात घट होण्याची भीती अनेक शेतकऱ्यांच्या मनात असते. अशा परिस्थितीत सेंद्रिय शेतीला पशुधनाधारित कृषी पूरक व्यवसायाची जोड दिल्यास उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध होऊ शकते.
दुधाळ पशुधनाचे आरोग्य व उत्पादकता सुधारण्यासाठी हिरवा व कोरडा चारा, संतुलित खुराक तसेच खनिज मिश्रणाचा नियमित वापर करावा, असा सल्ला त्यांनी दिला. यामुळे जनावरांचा भाकड काळ कमी होऊन दुग्धव्यवसायातून अधिक आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच शेणखतापासून गांडूळखत निर्मिती करून त्याची विक्री केल्यास पशुपालकांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेदरम्यान डॉ. कोरके यांनी नागपूर येथील व्ही.एन.आय.टी. संस्थेने विकसित केलेल्या ‘सुरभी’ पाचकसत्त्वाचे महत्त्व विशद केले. कोरड्या चाऱ्याची पचनक्षमता वाढविण्यासाठी त्याचा उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच पशुधनाचे नियमित तीन महिन्यांच्या अंतराने जंतनिर्मूलन करणे आणि वेळापत्रकानुसार लसीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे विविध संसर्गजन्य रोगांपासून पशुधनाचे संरक्षण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यशाळेस परिसरातील ४१ शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नों
दविला













