पोलिस प्रशासन न्यूज.

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्रातर्फे तीन दिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळेचे आयोजन


अंबाजोगाई : दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या वतीने केंद्रावर दिनांक २८ ते ३० मे २०२६ या कालावधीत तीन दिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विविध गावांतील ४९ शेतकरी व युवक-युवतींनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

कार्यशाळेमध्ये गावरान कुक्कुटपालन, ब्रॉयलर व लेअर पक्ष्यांचे संगोपन, कुक्कुट व्यवसायातील रोजगाराच्या संधी तसेच सेंद्रिय शेतीमध्ये कोंबडीखताचा प्रभावी वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक पशु शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र कोरके यांनी केले. आपल्या मार्गदर्शनात डॉ. देशमुख यांनी ग्रामीण युवक व शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन हा कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि नियमित उत्पन्न देणारा स्वयंरोजगाराचा प्रभावी व्यवसाय असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करून शेती करावी आणि शक्य त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन केले. प्रशिक्षणादरम्यान डॉ. रवींद्र कोरके यांनी कुक्कुटपालनाशी संबंधित विविध बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये देशी व सुधारित परसबागेतील कुक्कुट जाती, ब्रॉयलर व लेअर पक्ष्यांचे व्यवस्थापन, कुक्कुटशेडसाठी जागेची निवड, शेडची बांधणी, खाद्य व्यवस्थापन, एक दिवस वयाच्या पिल्लांची ब्रुडिंग प्रक्रिया, लसीकरण, औषधोपचार, विविध रोगांचे नियंत्रण, संगोपनासाठी लागणारे साहित्य तसेच उत्पादनाच्या विक्री व्यवस्थापनाचा समावेश होता.

कार्यशाळेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांसाठी तालुका केज येथील मौजे औरंगपूर येथे प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीदरम्यान खाजगी पद्धतीने कुक्कुटपालन करणारे श्री. ज्ञानेश्वर पिसाळ तसेच करार पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय करणारे श्री. हनुमंत भोसले यांनी आपले अनुभव व यशोगाथा सहभागी शेतकऱ्यांसमोर मांडल्या. यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसाय व्यवस्थापनाची माहिती मिळाली.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कोरके यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत शेती उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन करावे. रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळून कोंबडीखत, शेणखत, हिरवळीची खते, पिकांचे अवशेष व इतर सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


79
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!