बीड प्रतिनिधी :
अवघ्या सहा दिवसांत सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत देशातील चर्चेचा विषय बनलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांना मिळालेल्या धमक्यांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
बीड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीन वंजारे यांनी अभिजीत दिपके तसेच त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील दिपके यांच्या निवासस्थानी शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक प्रश्नांवर व्यंगात्मक पद्धतीने आवाज उठवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावर या पक्षाची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, अभिजीत दिपके यांना मिळालेल्या धमक्यांमुळे समर्थकांमध्ये चिंता व्यक्त होत होती.
प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, डॉ. जितीन वंजारे यांनीही पोलिस प्रशासनाचे आभार मानले आहेत.













