पोलिस प्रशासन न्यूज.

पाणीटंचाईवर मात करत डोमेगावच्या शेळके दांपत्याने फुलवली वनराई कृषी सहाय्यकांनी पाहणी करून केले कौतुक


सुखापूरी/ (रामकिसन अवधुत) प्रतिनिधी :=

निसर्गाचा लहरीपणा आणि भीषण पाणीटंचाई अशा दुहेरी संकटात जिथे उभ्या पिकांना जगवणे कठीण असते तिथे अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील एका प्रयोगशील दांपत्याने आपल्या अतोनात कष्टाने ‘घनदाट वनराई’ फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. बाबासाहेब शेळके आणि सौ.सविता शेळके या दांपत्याच्या या जिद्दीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

अंबड तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असताना अनेक ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. मात्र, डोमेगाव येथील बाबासाहेब शेळके आणि त्यांच्या पत्नी सविता शेळके यांनी खचून न जाता उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले.अगदी टंचाईच्या काळातही पाण्याचा थेंब न् थेंब जपून वापरत त्यांनी आपल्या परिसरातील वनराई हिरवीगार ठेवली आहे. केवळ झाडे लावून न थांबता, ती मुलांप्रमाणे जोपासण्याचे काम या दांपत्याने सातत्याने केले आहे.

दरम्यान शेळके दांपत्याच्या या स्तुत्य उपक्रमाची माहिती मिळताच कृषी सहाय्यक दिव्या तळेकर यांनी डोमेगाव येथे भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण वनराईची पाहणी केली.अत्यंत कष्टाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने जोपासलेली ही वनराई पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

आजच्या काळात जेव्हा वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे, तेव्हा शेळके दांपत्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई असतानाही इतकी घनदाट वनराई जोपासणे ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी आहे. पर्यावरण संवर्धनाचा हा आदर्श प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवायला हवा,अशा शब्दांत दिव्या तळेकर यांनी शेळके कुटुंबाचे कौतुक केले.

वाढत्या तापमानामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असताना डोमेगावच्या या वनराईमुळे वातावरण शितल वाटते. शेळके दांपत्याने दाखवून दिले की, जर जिद्द आणि मेहनतीची जोड असेल, तर निसर्गही साथ देतो. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होते. विशेष म्हणजे पर्यावरण संतुलित राखण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा यापूर्वी शासनाकडून वनश्री पुरस्काराने सन्मानही करण्यात आलेला आहे.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!