बीड, प्रतिनिधी :- आज दि.२६ मार्च २०२६ चैत्र शुक्ल अष्टमीच्या निमित्ताने महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३३०वी जयंती राज्यभरात आणि देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. महाविहार धम्मभूमी डॉ.भदंत आनंद कौसल्यायन नगर शिवणी येथे प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने राजा सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन भिक्खु धम्मशील थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी पू. भिक्खु धम्मशील यांनी सम्राट अशोकाच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.ते बोलतांना म्हणाले की अहिंसा, धम्म, समता आणि लोककल्याणाच्या संदेशाने जगाला प्रेरणा देणारे सम्राट अशोक हे भारतीय इतिहासातील एकमेवाद्वितीय शासक मानले जातात.
सम्राट अशोक (इ.स.पू. ३०४ ते २३२) हे मौर्य वंशातील तिसरे सम्राट होते. त्यांच्या काळात भारताचा विस्तार अफगाणिस्तानपासून दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आणि पूर्वेकडे बांगलादेशपर्यंत झाला होता. सुरुवातीला शूरवीर योद्धा म्हणून ओळखले जाणारे अशोक कलिंग युद्धातील प्रचंड रक्तपात पाहून व्यथित झाले. या युद्धानंतर त्यांनी हिंसेचा पूर्ण त्याग केला आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांचे जीवन लोककल्याण, धम्मप्रचार आणि नैतिक मूल्यांच्या प्रसारासाठी समर्पित झाले.
सम्राट अशोकांनी देशभरात धम्मशिलालेख कोरले, ज्यात प्रजा कल्याण, अहिंसा, सत्य, सहिष्णुता आणि प्राणिमात्रांबद्दल दया यांचा संदेश दिला आहे. त्यांनी रस्त्यांच्या कडेला झाडे लावली, धर्मशाळा बांधल्या, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि जनावरांसाठीही कल्याणकारी उपाययोजना केल्या. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपल्या मुली महेंद्र आणि मुलगा संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बौद्ध धर्म केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात पसरला आहे. भंतेजी पुढे बोलतांना म्हणाले की *सम्राट अशोकांचा संदेश आजही प्रासंगिक आहे*
सम्राट अशोकांचा “धम्म” हा केवळ बौद्ध धर्म नव्हे, तर सर्व धर्मांतील नैतिक मूल्यांचा समावेश करणारा सार्वत्रिक संदेश आहे. आजच्या काळात जातीयता, हिंसा आणि पर्यावरणीय संकटांमध्ये त्यांचा अहिंसा आणि लोककल्याणाचा आदर्श मार्गदर्शन करू शकतो.
या जयंतीनिमित्त बौद्ध आणि सामाजिक संघटनांनी “धम्माची शपथ” घेण्याचे आवाहन केले आहे. सम्राट अशोकांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने शांतता, समता आणि मानवतेच्या मूल्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रम प्रसंगी पू भिक्खु धम्मशील थेरो, भंते बुद्धबोधी, भास्कर सरपते, वसंत तरकसे, अंकुश डोळस, परमेश्वर विद्यागर, लक्ष्मण वाघमारे, सुनील निसर्गंध, अल्काताई डोंगरे, वंदना वाघमारे, सुनंदा जाधव, अंजली वीर,आशा वाघमारे, संगीता वीर, शाश्वत डोंगरे आदीसह उपासकांची उपस्थिती होती.














