वेळूवन बुद्ध विहारात धम्मबांधवांची मोठी उपस्थिती; समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेचा पुढाकार
केज (प्रतिनिधी):
येथील भीमनगर भागातील वेळूवन बुद्ध विहारामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३३० वी जयंती मोठ्या उत्साहात आणि धम्ममय वातावरणात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात परिसरातील अबालवृद्ध धम्मबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामूहिक त्रिशरण-पंचशीलाने प्रारंभ
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व धम्मबांधवांनी सामूहिक त्रिशरण-पंचशील ग्रहण केले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात मंगलमय आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण झाले होते.
शस्त्रापेक्षा मन जिंकण्याचा मार्ग महत्त्वाचा: जयपाल मस्के
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेचे अध्यक्ष जयपाल मस्के यांनी सम्राट अशोकांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “सम्राट अशोकांनी कलिंग युद्धातील भीषण नरसंहार पाहिल्यानंतर केवळ शस्त्रांचाच त्याग केला नाही, तर बुद्धांचा शांतीचा मार्ग स्वीकारून जगाला मानवतेची शिकवण दिली. केवळ तलवारीच्या जोरावर साम्राज्य विस्तारण्यापेक्षा लोकांची मने जिंकून ‘धम्मविजय’ कसा मिळवावा, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. तोच वारसा आज आपल्याला पुढे न्यायचा आहे.”
लोककल्याणकारी शासनाचा आदर्श
कोषाध्यक्ष चंद्रकांत मस्के यांनी सम्राट अशोकांच्या लोककल्याणकारी शासन पद्धतीवर बोलताना सांगितले की, प्रजेच्या हितासाठी विहिरी खोदणे, रस्ते बांधणे आणि वृक्षारोपण करणे यांसारखी कामे त्यांनी त्याकाळी केली, जी आजही आदर्श मानली जातात.
महिला पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती
या सोहळ्याला महिला शहर शाखेच्या अध्यक्षा सुनीता कांबळे, सरचिटणीस सुरेखा मस्के, कुसुम मस्के, रत्नमाला मस्के, हौसाबाई हजारे, पुष्पा मस्के, अश्विनी हजारे आणि कलावती हजारे यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सम्राट अशोकांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सरचिटणीस शिवकुमार मस्के यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र मस्के, कल्याण मस्के, दिपक मस्के, कपिल मस्के, समीक्षा मस्के, भक्ती मस्के, समीक्षा गायकवाड यांच्यासह अनेक उपासक-उपासिकांनी परिश्रम घेतले. शेवटी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ‘सरणत्तय’ घेऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली.













