बीड | प्रतिनिधी
चैत्यभूमी, मुंबई येथून निघालेल्या धम्मरथाचे आज दि. ४ मार्च २०२६ रोजी बीड शहरातील नागसेन बुद्ध विहार येथे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. विहार समितीच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या भंते संघाचे महासचिव पूज्य भदंत सुमेध बोधी ए. तसेच अमरावतीचे भंते आनंद यांचे पुष्पवर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आले.
बुद्ध, धम्म व संघाला त्रिवार वंदन करून उपस्थितांना मार्गदर्शन करताना पूज्य भदंत सुमेध बोधी म्हणाले, “खातो तो घास आणि घेतो तो श्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे.” प्रतिकूल परिस्थितीत डॉ. बाबासाहेबांना ‘आमचा धर्म कोणता?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सर्व धर्मांची चिकित्सा करून समतेचा, मानवतेचा आणि विज्ञाननिष्ठ असा सदधम्म दिला, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बुद्ध आणि त्यांचा धम्म हेच आम्हाला मिळालेले दुसरे संविधान आहे. हा सदधम्म दूरदृष्टीचा असून तो माणुसकी, समता आणि सत्यनिष्ठ जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. “भारतीय बौद्ध महासभा ही कोणाची वैयक्तिक संस्था नसून ती आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे समतेसाठी आणि मानवतेसाठी कार्य करणे हे आपले परम कर्तव्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
धम्म माणसाला राग, लोभ, द्वेष व पक्षपात शिकवत नाही. तथागत गौतम बुद्ध हे शांतता, समता आणि मानवतेचे प्रतीक असून त्यांनी संपूर्ण मानवजातीला नीतीनियमाने व सत्याच्या मार्गाने जगण्याची शिकवण दिली, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दि. १४ मार्च २०२६ रोजी ता. वडवणी (जि. बीड) येथे भव्य बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर उपस्थित राहणार असून त्यांच्या सखोल मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.तसेच दि. ५ मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत वडवणी येथे श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होऊन श्रामणेर व्हावे, असेही आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास जि. बीड (प) अध्यक्ष आयु. महालिंग दादा निकाळजे, उपाध्यक्ष (पर्यटन) अॅड. हणुमंत कांबळे, माजी विभागीय सचिव निसर्गंध गुरुजी, जिल्हा महिला अध्यक्षा निसर्गंधताई, बीड तालुका अध्यक्ष राजेंद्र ससाने, बौद्धाचार्य ज्ञानोबा पोटभरे, अॅड. डी. एम. विद्यागर, शिंदे ए. एस., वाघमारे के. एस., यू. एस. वाघमारे, प्रा. गाडे सर, प्रा. टी. जी. कांबळे सर, गायकवाड के. बी., जोगदंड भिवा, अनिल डोळस, बौद्धाचार्य भास्कर सोनवणे, बनसोडे गुरुजी, सुधाताई कांबळे, सुनिताताई शिंदे, रेखाताई सोनवणे, कुसूम पोटभरे, सुशीला गायकवाड, पद्मिनीताई गायकवाड, जाधव ताई, कौशल्या वाघमारे, छायाताई धनवे, ए. एस. उजगरे, विनोद अवसरमल, सुनंदा गाडे, तुळशीराम उजगीरे, आरूष सिरसाठ, पृथ्वीराज निसर्गंध आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी धम्मदेशनेचा लाभ घेत समता व मानवतेचा संदेश समाजात पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.












