बीड प्रतिनिधी – 5 वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर दानदात्याकडून मिळालेल्या वही पेन साहित्यातून व नगदी दानातून महामानव अभिवादन ग्रुप बीड मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वही पेन) वाटप कार्यक्रम सातत्याने राबवत आहे. या उपक्रमाला फुले शाहू आंबेडकरी प्रेमी दानदात्यांकडून मोठ्या प्रमाणात दान मिळते. त्या दानातून यावर्षी 1021 गरजू विद्यार्थ्यांना दहा फेऱ्यांमधून वही पेन वाटप करण्यात आले. महापुरुषांच्या जयंतीदिनी, स्मृतिदिनी, राष्ट्रीय दिनी विद्यार्थ्यांकरीता प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप केले जाते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रभातकार विद्यालय पूरग्रस्त कॉलनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर खंडेश्वरी परिसरातील विद्यालयत 116 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही पेन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह प्रभातकार विद्यालयाचे मुख्याध्यापक अंगदसिंग परदेशी लाभले होते तर दैनिक समर्थ राजयोगचे संपादक, वैभव स्वामी, दैनिक मराठवाडा साथीचे जिल्हा प्रतिनिधी संदीप बेदरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विचार मंचावर वाचाल तर वाचालचे अध्यक्ष डी.जी वानखेडे, समता सैनिक दलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ आठवले, बी.जी.दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.एम.भोले यांनी केले तर प्रस्ताविक डी.एम. राऊत यांनी करून महामानव अगोदर ग्रुप राबवत असलेल्या समाज उपयोगी विविध उपक्रमाबद्दल व पुढील नियोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली. सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करून मान्यवरांच्या हास्ते विनम्र अभिवादन करण्यात आले.विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना प्रमुख पाहुणे संदीप बेद्रे म्हणाले की आपल्या देशात अनेक वर्षापासून बहुजन शिक्षणा पासून कोसोमैल दूर होते. त्यांच्याकरिता क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे खुली केली. पुढे छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी शिक्षणाकरिता अनमोल कार्य केले. तेव्हा विद्यार्थ्यांनो “सर्व महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी शिकणार, शिक्षण घेताना कितीही अडथळे आले तरी उच्च शिक्षण घेऊन आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून ध्येयप्राप्ती करून सुजाण नागरिक बनून मोठेपणी समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य करीन पक्की खूणगाट बांधा. आज तुम्हा विद्यार्थ्यांना जी वही पेन महामानव अभिवादन ग्रुप कडून मिळते ती केवळ वही पे नसून प्रेरणा आहे, व ती यशाची पहिली पायरी समजून आपल्या जीवनाची वाटचाल ठेवा ” असा कळकळीचा व मोलाचा उपदेश केला. वैभव स्वामी यांनी गरजू विद्यार्थ्यांच्या शाळा , वस्त्या शोधून तेथे विद्यार्थ्यांच्या हिताकरिता 5 ठिकाणी मोफत शिकवणी वर्ग चालवणाऱ्या महामानव अभिवादन ग्रुपला त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृतीदिनी 13 नोव्हेंबरला 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे, महामानव अभिवादन ग्रुपच्या सर्वच उपक्रमाला सहाय्य करण्याचे भरीव आश्वासन दिले. अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अंगतसिंग परदेशी यांनी अत्यंत गरीबवस्ती परिसरात शाळेची स्थापना कशी झाली व ती चांगल्या प्रकारे चालवण्याकरिता सर्व स्तरातील दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास दीनदुबळ्या, मजुरी करणाऱ्या विद्यार्थ्यांतुनही डॉक्टर,इंजिनिअर, प्राध्यापक,शास्त्रज्ञ निर्माण होऊ शकतील.असाच सर्व शिक्षक वृंदांचा मनोदय आहे व प्रयत्न आहे असे स्पष्ट केले. तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर अभिवादन सलग्न होऊन समाजसेवा करण्याकरिता तत्परतेने सहभाग नोंदविण्याचे जाहीरपणे सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु.माही लोखंडे हिने राजषी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यकारभारात सामाजिक, शैक्षणिक आरक्षणाच्या बाबतीत जे अतुलनीय कार्य केले त्यावर उत्कृष्ट भाषण केले. तिचे टाळ्याच्या गजरात अभिनंदन करून वाचाल तर वाचाल मोफत फिरते वाचनायला तर्फे आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र पुस्तक मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांची शिस्त, शांतता बघून व पाहुन्यांच्या मार्गदर्शनाप्रती एकाग्रता बघून महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम भोले, प्रमुख अतिथी यांनी समाधान व्यक्त करून यावर्षी आणखीन पुन्हा 1 वेळा या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ए.बी.जौजाळ यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमास आर.डी. चक्रे, शिक्षक वृंद पी व्ही झिरपे, एस.एम.पंडित,डी.ए. नागरगोजे, टी.बी. गरड, बी.ए.ढमाळ,ए.बी.चितळे यांची उपस्थिती होती राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.












