नाशिक/मालेगाव:
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे काही दिवसांपूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका ३ वर्षीय चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून पीडित कुटुंबाला पाठबळ
या अत्यंत दुःखद प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी डोंगराळे येथे पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः पीडित कुटुंबियांशी फोनवर चर्चा केली. त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आणि पक्षाकडून पीडितांना पूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.
न्याय मिळेपर्यंत संघर्ष
ॲड. आंबेडकरांनी यावेळी विश्वास व्यक्त केला की, “पीडितेला न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील.”
सरकारकडे कठोर शिक्षेची मागणी
पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध करत, सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकारने तात्काळ प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या दुःखद प्रसंगी वंचित बहुजन आघाडीने पीडित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत, मृत चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.













