केज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत हॉटेल कृष्णा इम्पिरियल, नवीन बसस्थानकाजवळ, अकोला येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
राज्यभरातील पत्रकार, संपादक, वृत्तनिवेदक, छायाचित्रकार व माध्यम क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या अधिवेशनात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा, विचारमंथन व मार्गदर्शन होणार आहे. पत्रकारांच्या समस्या, हल्ले, संरक्षण, पत्रकारिता क्षेत्रातील बदल आणि संघटनात्मक बळकटी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
या महत्त्वपूर्ण अधिवेशनाला राज्यभरातील पदाधिकारी, सदस्य, पत्रकार व पत्रकारप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा केजचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती शंभ्रलाल मेश्राम, डॉ. विश्वासराव आरोटे, संजय भोकरे, खासदार अनूप धोत्रे, आमदार डॉ. विश्वासराव आत्रे, रणधीर सावरकर, संजय भोकरे, साजिद खान पठाण, वसंत खंडेलवाल, नितीन देशमुख व हरीश पिंपळे उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, डॉ. संतोष हुशे, बळीरामजी सिरसकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, संचालक सदाफराजी लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण अंधारे तसेच लोकसभा समन्वयक संदीपदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दुपारी आयोजित परिसंवादात “पत्रकारांवरील वाढते हल्ले व शिस्तभंगाची कारवाई” या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक निरंजन टकले, एबीपी माझाच्या संपादक हिना कोसर, दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, एएनएन न्यूजचे संपादक निलेश धांडे, प्रदेश महासचिव राजेंद्र पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
पुरस्कारांचे वितरणही होणार
सकाळी आयोजित पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी विदर्भ प्रमुख नयन मुंढे राहणार आहेत. यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध पत्रकारांना कृषी पत्रकारिता, डिजिटल पत्रकारिता, युद्धवार्ता पत्रकारिता, प्रेरणादायी पत्रकारिता, आरोग्य पत्रकारिता, तिसरा डोळा पत्रकारिता आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच जीवन गौरव पुरस्कार, जीवन संगम पुरस्कार, विवेकवादी पत्रकारिता पुरस्कार आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार यांचेही वितरण होणार आहे.
या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन अकोला जिल्हाध्यक्ष गणेश नथुजी सुरजुसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून देवानंद गहिले (पातूर), प्रदीप गावंडे (बार्शीटाकळी), संजय उमक (मूर्तीजापूर) व सम्राट वानखडे (बाळापूर) हे तालुकाध्यक्ष आयोजनात सक्रिय सहभाग घेत आहेत.
चौकट बातमी
राज्यभरातील पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा केजचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यभरातील पत्रकार, संपादक, वृत्तनिवेदक, छायाचित्रकार तसेच पत्रकारप्रेमी नागरिकांनी अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.
📰 लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज | Digital News
“सत्याचा आवाज, जनतेची ताकद













