उमेश फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार; डॉ. सुरेशचंद्र मेहरोत्रा यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्तुत्य उपक्रम
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी विभागातील एका पात्र संशोधक विद्यार्थ्याला आता दरमहा १० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी मुंबई येथील उमेश फाऊंडेशन आणि विद्यापीठ यांच्यात शनिवारी (दि. १७) सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद कक्षात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. संगणकशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुरेशचंद्र मेहरोत्रा यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उमेश फाऊंडेशनने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. या करारानुसार, निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्याला सलग दोन वर्षे ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र शिरसाठ, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. रमेश मंझा, उमेद फाऊंडेशनचे संचालक सुदीप मेहरोत्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉ. भारती गवळी, डॉ. प्रवीण यन्नावार आणि डॉ. सुनील निंभोरे हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते.
कुलगुरूंची घेतली सदिच्छा भेट
करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी डॉ. सुरेशचंद्र मेहरोत्रा आणि प्राचार्य डॉ. उमा मेहरोत्रा यांनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची सदिच्छा भेट घेतली. या उपक्रमामुळे विभागातील संशोधनाचा दर्जा उंचावण्यास आणि विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे.














