बीड (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या नागरिक, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांना ऊन, पाऊस आणि थंडीत निवाऱ्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेने प्रशासनाकडे केली आहे. विशेषतः उन्हाळ्यामध्ये उपोषणकर्त्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत असल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.११ वर्षांपासूनचा पाठपुरावा .डॉ. संजय तांदळे आणि सुदाम कोळेकर यांच्या नेतृत्वाखालील या संघटनेने गेल्या ११ वर्षांपासून लोकशाही मार्गाने उपोषण स्थळावर निवारा बांधण्याची सातत्याने मागणी केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न आजही प्रलंबित आहे.रोटरी क्लबची मदत सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रोटरी क्लब बीड हे उपोषण स्थळी निवारा बांधून देण्यास तयार असूनही जिल्हा प्रशासनाकडून केवळ दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.पुणे येथील उदाहरणाचा आधार .पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालय, शिवाजीनगर येथे शासनाने उपोषण करणाऱ्यांसाठी निवाऱ्याची सोय उपलब्ध केली आहे. त्याच धर्तीवर बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निवाऱ्यासाठी जागा उपलब्ध करून सोय करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने डॉ. संजय तांदळे आणि सुदाम कोळेकर यांनी दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन पाठवले आहे. प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे लक्ष देऊन तातडीने निवारा उपलब्ध करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.













