अहिल्यानगर(अहमदनगर): अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. गावातल्या काही गुंडांनी संजय वैरागर नावाच्या मातंग समाजातील तरुणाला अमानुषपणे मारहाण केली. या हल्ल्यात पीडित तरुणाचे हात-पाय मोडले असून, एक डोळा निकामी झाला आहे. क्रूरतेची हद्द ओलांडत आरोपींनी पीडित तरुणाच्या शरीरावर लघुशंका (लघवी) करून त्याला अज्ञातस्थळी फेकून दिले. ही घृणास्पद घटना समोर आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ‘एक्स’ (X) हँडलवर ट्विट करून या घटनेची माहिती दिली आणि आरोपींवर ‘मकोका’ (MCOCA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेमकी घटना काय? ॲड. आंबेडकरांच्या माहितीनुसार, संजय वैरागर या तरुणाला गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) १५ ते २० गुंडांनी घरातून उचलून नेले. अज्ञात स्थळी नेऊन त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या हाता-पायांवरून मोटारसायकल घालून त्याचे हात-पाय मोडण्यात आले. गंभीर मारहाणीमुळे त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. मारहाण करून आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी क्रूरता दाखवत तरुणाच्या शरीरावर लघुशंका करून त्याला फेकून दिले. ॲड. आंबेडकरांची आक्रमक भूमिका: पीडित तरुण संजय वैरागर याला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पीडित तरुणाच्या वडिलांशी फोनवर संवाद साधून घटनेची माहिती घेतली. ते लवकरच पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रुग्णालयात जाऊन कुटुंबाची भेट घेतली आहे. वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी असून, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ॲड. आंबेडकर यांनी या प्रकरणातील गुंडांना ‘मकोका’ कायद्यांतर्गत शिक्षा व्हावी, अशी आग्रही मागणी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.













