श्रीरामपूरात तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन
अहमदनगर | सुनिल वाघमारे.
२३ जुलै
नवी दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात शिक्षणाशी संबंधित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित पोलिस बळप्रयोगाच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीने श्रीरामपूर येथे तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदार तसेच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये,
युवा आघाडीचे जिल्हामहासचिव सुनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुकाध्यक्ष सागर खरात यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(१)(अ) (अभिव्यक्ती स्वातंत्र्य), अनुच्छेद १९(१)(ब) (शांततापूर्ण व निःशस्त्रपणे एकत्र येण्याचा अधिकार) आणि अनुच्छेद २१ (जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) या मूलभूत अधिकारांच्या चौकटीत विद्यार्थी आपले आंदोलन करीत असताना त्यांच्यावर झालेला कथित पोलिस बळप्रयोग हा लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचविणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी केंद्राचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, जंतर-मंतर येथील घटनेची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच जखमी विद्यार्थी-विद्यार्थिनींना तातडीने वैद्यकीय उपचार, आवश्यक मदत आणि योग्य भरपाई देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
वंचित बहुजन युवा आघाडीने निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अवाजवी बळप्रयोग लोकशाही व्यवस्थेला शोभणारा नसून, नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारीच आहे.
सदर आंदोलन व निवेदन कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, तसेच संम्यक विद्यार्थी आंदोलन, श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने करण्यात आले.
यावेळी vba मीडिया प्रमुख विलास अहिरे, तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य विशाल पठारे, शहराध्यक्ष ओम त्रिभुवन, तालुका महासचिव ॲड. अण्णासाहेब मोहन, तालुका उपाध्यक्ष संतोष त्रिभुवन, डॉ. चंद्रसेन भडांगे, शाम शिरसाठ, यश मोरे, अक्षय खरात, आदित्य भालेराव, शुभम खरात, प्रतिक तेलोर, सागर लोखंडे, रितेश पठारे, यश खरात, सिद्धार्थ बागुल, आशिष खरात, दादा माने, सचिन खरात, प्रसाद अमोलिक, अनिकेत खरात, दत्तू पुंडे, कानिफनाथ जाधव, रमेश भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











