पोलिस प्रशासन न्यूज.

चितळी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा भंडाफोड; दलित वस्ती निधीसह विविध योजनांच्या चौकशीसाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक


दलित वस्ती निधीच्या कथित गैरवापरापासून ग्रामनिधी, आरोग्य, शाळा  अंगणवाडीतील अनियमिततेपर्यंत सखोल चौकशीची मागणी; कारवाई  झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

अहमदनगर प्रतिनिधी :- सुनिल वाघमारे

राहाता तालुक्यातील चितळी ग्रामपंचायतीमध्ये नवबौद्ध व अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी मंजूर करण्यात आलेल्या दलित वस्ती निधीचा कथित गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. यासोबतच ग्रामनिधी, आरोग्य विभाग, प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी योजनांमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रविण आल्हाट, शिर्डी शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थिती मधे, जिल्हा उपाध्यक्ष बबलूभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या मागणीत चितळी ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व दप्तरे व कागदपत्रे तातडीने ताब्यात घेऊन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दलित समाजाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा उद्देशपूर्ण वापर न होता त्याचा कथित गैरवापर झाल्यामुळे समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

याशिवाय गावातील विविध विकासकामांसाठी मंजूर झालेल्या ग्रामनिधीच्या खर्चातही मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोग्य विभागातील कामकाज, प्राथमिक शाळेतील खर्च व विविध योजनांची अंमलबजावणी तसेच अंगणवाडी व्यवस्थापनातील कथित भ्रष्टाचाराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

 

आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देऊन चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आनंद भंडारे यांच्याकडे तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून चौकशी व कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 

संबंधित प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वंचित बहुजन युवा आघाडीने दिला आहे. तसेच प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

“दलित वस्ती निधीपासून ग्रामनिधीपर्यंतच्या प्रत्येक रुपयाचा हिशेब द्या; अन्यथा जनतेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरू”, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.


80
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!