केज,प्रतिनीधी:
केज तालुक्यातील ढाकेफळ गावातील दोन होतकरू मुलींनी बीड पोलीस भरतीत यश मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. कु. उर्मिला श्रीकिसन थोरात आणि कु. मोहिनी गोरखनाथ थोरात या दोघींची पोलीस भरतीत निवड झाल्याने ढाकेफळ गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दोन्ही मुलींनी हे यश संपादन केले. ग्रामीण भागातील अडचणींवर मात करत त्यांनी नियमित सराव, धावणे आणि शारीरिक तयारी केली होती. त्यांच्या या यशामुळे परिसरातील इतर मुलींसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
कु. उर्मिला श्रीकिसन थोरात व कु. मोहिनी गोरखनाथ थोरात यांच्या यशाबद्दल गावातील नागरिक, नातेवाईक, शिक्षक तसेच विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दोन्ही मुलींनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक शिक्षक व मित्रपरिवाराला दिले असून पुढे प्रामाणिकपणे सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ढाकेफळ गावातील या दोन मुलींच्या यशामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे














