केज (बीड): सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाचे निमित्त साधून ही पोस्ट करण्यात आली होती.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवासी रोहन गलांडे याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टेटस ठेवले होते. या स्टेटसमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक आक्षेपार्ह मजकूर वापरण्यात आला होता. या कृत्यामुळे सामाजिक सलोखा बिघडून दोन जातींमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका
या घटनेची माहिती मिळताच केज येथील दलित चळवळीतील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले. स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष योगेशभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक स्वप्नील उणवणे यांची भेट घेतली. समाजात विष पेरणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या शिष्टमंडळात लखन हजारे, निलेश साखरे, बाळासाहेब ओव्हाळ,चंद्रकांत खरात सर ,अशोक गायकवाड, तात्या गवळी, प्रदीप गायकवाड, गौतम बचुटे, समाधान बचुटे,प्रविण मस्के ,बाबुराव गालफाडे,अमोल मस्के ,लिंबराज गायकवाड,पांडुरंग जोगदंड, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
पोलीस कारवाई
योगेशभाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांनी रोहन गलांडे विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हा रजि. नं.: ०७/२०२६
कलम: भारतीय न्याय संहिता (BNS) १८६(१), २९९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या पोलीस निरीक्षक स्वप्नील उणवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मुरकुटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सामाजिक शांतता राखण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर कोणत्याही प्रक्षोभक पोस्ट शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.














