परळी :=30 जागांसाठी जागावाटप निश्चित; ‘प्रगतीसाठी समर्पित’ असल्याचा दिला संदेश.आगामी परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी (वंबआ) आणि समाजवादी पक्ष (सप) यांनी एकत्रित येत ‘महाआघाडी’ची अधिकृत घोषणा केली आहे. परळीचा सर्वांगीण विकास, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा निर्धार या आघाडीनं व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी यावेळी “परळीकरांसाठी एकत्र… परळीच्या भवितव्यासाठी समर्पित!” ही महाआघाडीची घोषणा केली.
विकासाच्या मुद्द्यांवर फोकस:
नेत्यांनी स्पष्ट केले की, हा लढा पदांचा नसून, परळीच्या प्रगतीचा आहे. शहरवासियांना स्थिर नेतृत्व, पारदर्शक कारभार आणि प्रामाणिक जनसेवा देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. पाणी, रस्ते, नाले, बाजारपेठांची सुव्यवस्था, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांच्या उभारणीकडे एकत्रितपणे लक्ष केंद्रित केले जाईल, अशी भूमिका महाआघाडीने मांडली.
जागावाटपाचे स्वरूप (एकूण 30 जागा):पक्ष जागा
काँग्रेस 16
वंचित बहुजन आघाडी 6
इतर मित्रपक्ष 8
एकूण 30. महाआघाडीने “समृद्ध, सुशोभित, सुरक्षित परळी हा आमचा संकल्प” असल्याचे जाहीर करत, परळीचा विकास करताना सामाजिक सलोखा दृढ करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासह उद्या 20 नोव्हेंबर रोजी सकाळी प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस व वंबआचे प्रमुख पदाधिकारी आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.













