बीड प्रतिनिधी:वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) मुंबईतील चैत्यभूमीवर जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील लाखो अनुयायांच्या सोयीसाठी बीड ते मुंबईदरम्यान विशेष रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे.प्रवाशांच्या अडचणी दूर करण्याची मागणी.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षी ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत राज्यातील विविध स्थानकांवरून चैत्यभूमीवर जाणाऱ्या अनुयायांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जातात. मात्र, बीडहून थेट मुंबईला जाणारी कोणतीही विशेष गाडी उपलब्ध नाही. यामुळे दरवर्षी जिल्ह्यातील हजारो अनुयायांना मुंबईपर्यंतच्या प्रवासात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो.भावनांचा सन्मान करण्याची भूमिका बीड जिल्ह्यातील लाखो अनुयायांचा चैत्यभूमीवर जाण्याचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी बीड रेल्वे स्थानकावरून थेट मुंबईकडे जाणारी विशेष रेल्वे सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. जिल्हा प्रशासनाने रेल्वे विभाग व राज्य शासनाशी त्वरित पाठपुरावा करून ही सेवा उपलब्ध करावी. बाबासाहेबांच्या अनुयायांसाठीची ही सेवा केवळ सोय नसून, त्यांच्या भावनांचा सन्मान आहे, असे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अजय सरवदे, खंडू नाना जाधव, ज्ञानेश्वर कोठेकर, संदीप जाधव, रोहन मगर, जंजाळ सर आणि मिलिंद सरपते यांनी स्पष्ट केले












