जालना (अंबड/घनसावंगी):
जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ व सागर सहकारी साखर कारखान्याकडून जळालेल्या उसाच्या बिलातून ५०० ते १००० रुपये प्रति टन कपात केली जात आहे. ही कपात साखर आयुक्तांच्या नियमांचे उल्लंघन करणारी असून, शेतकऱ्यांची ही ‘रझाकारी लूट’ तातडीने थांबवावी, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखाना व्यवस्थापनाला देण्यात आले आहे.
नेमका विषय काय?
समर्थ कारखान्याने जळीत ऊस गाळपासाठी आल्यास सभासद शेतकऱ्यांच्या बिलातून ५०० रुपये आणि बिगर सभासद शेतकऱ्यांच्या बिलातून १००० रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रति एकरी ३० ते ४० हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शॉर्ट सर्किट किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे ऊस जळाल्यास आधीच वजन घटते आणि ठिबक सिंचन, मोटारी, पाईप्स अशा साहित्याचेही नुकसान होते. अशा संकटात कारखान्याने केलेली ही भरमसाठ कपात अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नियम काय सांगतो?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी निवेदनात स्पष्ट केले की, “साखर आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जळीत उसाला केवळ ५ ते १० टक्के रक्कम कमी करण्याचा नियम आहे. मात्र, समर्थ कारखाना २० ते ३५ टक्के रक्कम कपात करत आहे. नियमानुसार ही कपात सभासदांसाठी १५० रुपये आणि बिगर सभासदांसाठी ३०० रुपये इतकीच असायला हवी.”
आंदोलनाचा इशारा
कारखाना प्रशासनाने येत्या ७ दिवसांत कपातीचा दर कमी करून साखर आयुक्तांच्या नियमाची अंमलबजावणी करावी. तसे न झाल्यास शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ‘समर्थ’ साखर कारखान्यासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.













