वाघेबाभूळगाव (प्रतिनीधी):
येथील जिल्हा परिषद (अनु.) माध्यमिक शाळेत ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासोबतच यावेळी विद्यार्थ्यांनी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेत सामाजिक जनजागृतीचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. धनगर सर होते. त्यांच्या हस्ते विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वातावरणात भारदस्त आवाजात झेंडा गीत सादर केले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली.
याप्रसंगी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतानाच सामाजिक सुधारणांवरही भर देण्यात आला. श्री. डोईफोडे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा दिली. समाजातील या अनिष्ट आणि घातक कुप्रथेविरुद्ध लढा उभारण्याचा आणि समाजात जागृती घडवून आणण्याचा संकल्प या वेळी सर्वांनी केला.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. आरकडे सर यांनी केले. या सोहळ्यास श्री. डोईफोडे सर, श्री. डेंगळे सर, श्रीमती राख मॅडम, तसेच केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सर, श्री. काळकुटे सर, श्री. शिंदे सर, श्रीमती उगिले मॅडम, श्रीमती केंद्रे मॅडम आणि श्रीमती सोनार मॅडम यांच्यासह दोन्ही शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत आणि सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.












