रामकिसन अवधूत ( जालना प्रतिनिधी ):
“तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनण्याचा विचार करावा. आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष व्यवसायाचे स्वरूप देताना योग्य पद्धत,बाजारपेठेचा अभ्यास,सातत्य आणि ग्राहकांशी संवाद या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.केवळ सबसिडी मिळते म्हणून व्यवसाय करू नका.सबसिडी ही व्यवसायाला पुढे नेणारी मदत समजा,”असे प्रतिपादन समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी केले.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED),जालना,शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान व शांताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पशुसंवर्धन आधारित शेळीपालन,कुक्कुटपालन,गाय-म्हैस पालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सतीश घाटगे बोलत होते.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ग्राहकांची मागणी,बाजारपेठ,पुरवठा,उत्पादनाची गुणवत्ता आणि विक्री व्यवस्था यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.दूध व्यवसायाला सध्या चांगली संधी असून दुग्ध व्यवसायासोबत शेळीपालन व शेळीच्या दुधालाही बाजारपेठ निर्माण होऊ शकते.शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता स्वतःच्या कष्टातून आणि योग्य नियोजनातून व्यवसाय उभा करण्याची गरज आहे,असे घाटगे यांनी सांगितले.
“राजकारणाच्या मागे फिरण्यापेक्षा रोजीरोटी आणि आर्थिक स्वावलंबनाकडे लक्ष द्या.शासन प्रत्येकाला पुरेसे देऊ शकत नाही.शासनाच्या योजनांचा योग्य उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे,” असा संदेशही त्यांनी दिला.यावेळी शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आर.व्ही.छल्लारे म्हणाले की,या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करावा,हा आहे.शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन तरुणांनी रोजगारनिर्मितीबरोबरच स्वतःची आर्थिक उन्नती आणि आत्मनिर्भरता साधावी,यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिरुद्ध झिंझुर्डे म्हणाले की,शेती आणि शेतीशी संबंधित उद्योग केल्याशिवाय ग्रामीण भागातील तरुणांसमोर पर्याय नाही.तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळून स्वतःच्या पायावर उभे राहावे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी राज्यात दुग्ध व्यवसायाला मोठी संधी निर्माण झाली असून जिल्ह्यात धवलक्रांती घडविण्याची गरज असल्याचे सांगितले.
जिल्हा अग्रणी बँकेचे कैलास तावडे यांनी विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय सुरू करता येतो.व्यवसायासाठी आवश्यक कर्ज व आर्थिक सहकार्यासाठी बँकशेतकरी व तरुणांच्या पाठीशी राहील, असे मार्गदर्शन केले.मार्गदर्शक विष्णू पिवळ यांनी शेळीपालन हा शेतकऱ्यांसाठी “एटीएम”सारखा पूरक व्यवसाय ठरू शकतो, असे सांगत शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाचे महत्त्व स्पष्ट केले.मात्र व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्यावसायिक व्यवस्थापक अशोक काकडे म्हणाले की, “शेतकरी पिकवू शकतो.मात्र अनेकदा विक्री व्यवस्थापनात कमी पडतो.त्यामुळे उत्पादनासोबत त्याचे योग्य मार्केटिंग करता आले पाहिजे.”बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांशी संवाद आणि विक्री व्यवस्थापन हे व्यवसायाच्या यशासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास भाजप ज्येष्ठ नेते भगवान बर्वे,शिवसेना उपतालुकाप्रमुख बंटी आटोळे,सरपंच बंडू मुंढे,ग्रामपंचायत सदस्य नारायण वायाळ,हनुमान भगत,अधीक्षक संभाजी काळे,पत्रकार कीर्तिनंद गांगुर्डे,ॲड.राजेंद्र पवार,मुकेश डुचे,ॲड.मोहन रोटे,राहुल कणके,अशोक कणके,विलास मस्के,नारायण कणके,माऊली ठोंबरे,भागवत महाराज, प्रेम उढाण,नाईकवाडे,तान्हाजी धुमाळ,अजय गावडे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी व मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.











